<
चाळीसगाव(प्रतिनिधी)- गेल्या ५ दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यावरील आभाळ प्रकोपाचे सावट अधिक गडद झाले आहे. मंगळवारी दि.२८ रोजी पहाटे पाच वाजता तितूर व डोंगरी नदीला पाचव्यांदा पुर आला असून दुकानांमध्ये पाणी घुसले. ढगफुटी सदृश्य पाऊस व गुलाब चक्रीवादळाचा मोठा तडाखा तालुक्याला बसत असून गत २४ तासात ४४५ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे उरल्या – सुरल्या खरीप पिकांचा चिखल झाला आहे.
झालेल्या नुकसानीमुळे शेतक-यांच्या डोळ्यातूनही अश्रूंचा पूरच वाहू लागला आहे. तालुक्यात मंगळवार अखेर ११०२.१३ पर्जन्यमान झाले आहे. सातही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. अश्या संकटाचा काळात बळीराजाला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून चाळीसगाव तालुक्यात सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहीर करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली आहे.