<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमातंर्गत अधिसूचित केलेली माहिती विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करून ती नियमितपणे अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.
माहिती अधिकार दिवसानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, सौ. शुभांगी भारदे, प्रसाद मते, किरण सावंत-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार जितेंद्र कुवर, पंकज लोखंडे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो, तर 6 ते 12 ऑक्टोबर हा कालावधी माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याचबरोबर माहिती अधिकार अर्जांची संख्या कमी होण्यासाठी दर सोमवारी दुपारी तीन ते पाच या कालावधीत कार्यालयातील अधिसूचित केलेले अभिलेख सर्वसामान्यांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत. या उपक्रमाची आपापल्या कार्यालयात अंमलबजावणी करीत शासन निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे.
त्याचबरोबर या सप्ताहनिमित्त शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठासंह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार अधिनियमावर आधारित वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमालेचे आयोजन करावे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय सामाजिक संस्थांच्या मदतीने भित्तीचित्र स्पर्धेसह विविध उपक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी सांगितले.