<
मुंबई(प्रतिनिधी)- कुठल्याही शासन मदतीशिवाय समाजातील सधन लोकांकडून संसाधन गोळा करून ते समाजातीलच गरजू लोकांसाठी खर्च करणाऱ्या रेडक्रॉस सोसायटीचे राज्यातील कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबईच्या वतीने आर्थिकदृष्ट्या सर्वसाधारण कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्सचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला इंडियन रेडक्रॉस सोसायटी मुंबईचे अध्यक्ष सुरेश देवरा, महामंत्री विजय कुमार सिंघल, रेडक्रॉस सोसायटी व्यवस्थापन समितीचे सदस्य, दक्षिण आफ्रिकेच्या मुंबईतील वाणिज्यदूत आंद्रिया कुन, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद तसेच नेदरलँड्स, पोलंड, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड दूतावासातील महिला अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जागतिक महायुद्ध काळात स्थापन झालेल्या रेडक्रॉस संस्थेने प्रदीर्घ काळ आपत्तीच्या वेळी लोकांना सेवा दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रेडक्रॉस चांगले काम करीत आहे. केवळ लोकांकडून मिळालेल्या देणगीवर संस्था काम करीत असताना कोविड काळात संस्थेने ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझर तसेच ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचे चांगले काम केले असे सांगून विविध देशातील दूतावासांनी रेडक्रॉसला मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बी.एम.रुईया महिला महाविद्यालयातील दहा मुलींना व त्यांच्या आईंना सॅनिटरी नॅपकिन्स व मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्स किट्स देण्यात आले.मुंबई रेडक्रॉसचे अध्यक्ष सुरेश देवरा यांनी प्रास्ताविक केले तर महामंत्री विजय कुमार सिंघल यांनी आभार मानले.