<
मुंबई(प्रतिनिधी)- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार रु. थेट कर्ज योजनेची मर्यादा रुपये १ लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली असून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील रिक्त पदे भरण्यास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. रिक्त पदासंदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश यावेळी श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 119 वी बैठक बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. संचालक दिलीप हळदे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत संचालक मंडळाच्या 118 व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या नियमित आस्थापनेवरील रिक्त असलेली पदे भरण्यास मंजुरी, नियमित आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती आदी विषय मंजुरीसाठी बैठकीत मांडण्यात आले.
बैठकीत महामंडळाच्या नियमित आस्थापनेवर एकूण 96 पदे मंजूर असून रिक्त पदे भरण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना व राष्ट्रीय मागासवर्ग वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली या दोन्ही योजनांची वसुली वाढविण्याकरिता थकित कर्जावरील व्याजाच्या रकमेत ५० टक्के सवलत लागू करणे आणि महामंडळाची यापूर्वीची रुपये 25 हजार थेट योजनेची मर्यादा रुपये 1 लाख पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.