<
ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टरला भेट 16 कोटी रुपयांचा सुविधा प्रकल्प 250 महिलांना रोजगार
नागपूर(प्रतिनिधी)- छोट्या व लहान उद्योगांसाठी सामाईक सुविधा केंद्राच्या निर्मितीमुळे बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन सुलभ होते. कामठी येथील ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टरमुळे तयार कपड्यांच्या निर्मितीला चालना मिळाली आहे. अत्याधुनिक यंत्र सामुग्रीमुळे हा गारमेंट उद्योग विकसित होत असून या उद्योगात 250 महिला प्रशिक्षित झाल्या आहेत. अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.
कामठी तालुक्यातील मसाळा येथे ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टरला विभागीय आयुक्तांनी भेट देवून येथील गारमेंट उत्पादनाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, क्लस्टरचे प्रमुख विपुल पंचमेटिया उपस्थित होते.नागपूर शहर व सभोवताली सुमारे एक हजार गारमेंट्स उद्योग असंघटितपणे कार्यरत आहेत. या समूहाद्वारे तयार कपडे तसेच प्रासंगिक कपड्याचे उत्पादन केले जाते. या उद्योगामध्ये क्षमतावृद्धी करुन सामाईक सुविधा केंद्रामार्फत एम्ब्रॉयडरी, वॉशिंग तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. अशा सर्व उद्योगांसाठी सामाईक सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी यावेळी सांगितले.
गारमेंट निर्मिती क्षेत्रातील 38 घटकांनी एकत्र येऊन ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टर या विशेष सुविधा केंद्राची स्थापना केली. केंद्र शासनाने या प्रकल्पात मान्यता दिली आहे. सामाईक सुविधा केंद्रासाठीच्या 15 कोटी 91 लाख या प्रकल्प किंमतीपैकी 13 कोटी 40 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. तसेच 2 कोटी 51 लक्ष रुपये विशेष हेतू वाहनाचा सहभाग आहे. हा प्रकल्प 2016 मध्ये कार्यान्वित झाला असून मागील दोन वर्षांपासून डिझाईन व एम्ब्रॉयडरी सुविधा सुरु आहे. या प्रकल्पाला यामुळे 400 लक्ष रुपये सेवाशुल्क जमा झाले आहे. मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे 40 लक्ष रुपयांचे अत्याधुनिक नवीन यंत्र सुद्धा कार्यान्वित करण्यात आले आहे. उद्योग विभाग तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण योजनांची या उद्योगासोबत सांगड घालून 250 महिलांना प्रशिक्षित करण्यात आले आहेत.
सामाईक सुविधा केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यावर वार्षिक एक हजार कुशल कारागीर उपलब्ध होणार आहे. या सामाईक सुविधा केंद्रामुळे नागपूर परिसरातील तयार कपडे निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळत असल्याने या उद्योगातील वार्षिक उलाढाल 30 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती उद्योग सहसंचालक श्री. धर्माधिकारी यांनी यावेळी दिली. प्रारंभी ऑरेंज सिटी गारमेंट क्लस्टरचे प्रमुख विपुल पंचमेटिया यांनी सादरीकरण करुन प्रकल्पाबाबत माहिती दिली.