<
सुलज(वार्ताहर)- गोपालन नॅशनल स्कूल बंगलोर तर्फे “कन्सोनंस २०२१” निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भारतभर आंतर-शालेय गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत इंडियन आणि वेस्टर्न प्रकारचे गीत गायन करणाऱ्या भारतभरातील शाळकरी मुला-मुलींना ऑनलाईन गीत गायन करणाऱ्यासाठी आमंत्रित केलं होतं. नुकतीच “कन्सोनंस २०२१” च्या गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली, त्यामध्ये सुलज येथील रहिवाशी असलेले आणि नोकरी निमित्त अकोटला पोलीस विभागात कार्यरत असलेले आयु. दिलीप तायडे यांची कन्या व विद्यांचल स्कूल अकोट येथे इयत्ता चौथीत शिकणारी बालगायक कु. वृषाली तायडे ने संपूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक पटकावून मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत वृषालीने इंडियन गीत गायन स्पर्धेत सहभाग नोंदवून “मेरे ढोलना सून…” हे गीत अंतिम फेरीत गावून व्दितीय स्थान पटकावून विजेती ठरली. ग्रामीण भागातील वृषालीच्या गायन शैलीने स्पर्धेच्या परिक्षकांसह सहभागी स्पर्धकांना भारावून सोडले, तिच्या गोड आवाजाने आणि इतक्या कमीवयात कोणत्याही प्रशिक्षणाअभावी राष्ट्रीय पातळीवर आयोजित आंतर-शालेय गीत गायन स्पर्धेत संपूर्ण भारतभरातील सहभागी झालेल्या बाल गायकातून व्दितीय क्रमांक मिळवून वृषालीने महाराष्ट्राची मान उंचावली.
वृषालीच्या या यशाचे कौतुक सर्वत्र होत असून त्यासोबतच आई-वडील, शिक्षक, मित्र- मैत्रिणी, नातेवाईक शुभेच्छा देऊन स्वागत करत आहेत. वृषालीच्या यशासाठी विद्यांचल स्कूल मधील संगित विभागाने सर्वाधिक परिश्रम घेऊन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. वृषालीने तिच्या गायन कौशल्य, आवाज आणि मेहनत या त्रिसुत्रीच्या सहाय्याने यशोशिखर संपादित करून नाव लौकिक मिळवावे, अशा सदिच्छा आयोजकांकडून सन्मानचिन्ह, पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र स्विकारतांना सर्वांनी दिल्या.