<
मुंबई(प्रतिनिधी)- राज्यातील अनाथालयांमध्ये राहून शिक्षण घेतलेल्या आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या अनाथ तरुणांच्या करियरची वाट आता सोपी झाली आहे. अनाथांसाठी नोकरी, शिक्षणात एक टक्का आरक्षण लागू केल्यामुळे अनाथ संवर्गातून मी पहिला अधिकारी ठरलो आहे, याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया नारायण इंगळे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वनक्षेत्रपाल (RFO) म्हणून अनाथ संवर्गातून नारायण इंगळे यांची नियुक्ती झाली आहे. अनाथ संवर्गातून नियुक्ती झालेले श्री. इंगळे राज्यातील पहिले अधिकारी आहेत. याबाबत त्यांनी राज्य शासन, महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर व राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले.
अनाथ संवर्गातून आरक्षणाचा लाभ यापुढे तरुणांना नक्कीच मिळेल. त्यामुळे त्यांच्या भविष्यातील संधीची दारे आता उघडली गेली असून त्यांच्यापुढे करिअरच्या दिशा मोकळ्या झाल्याची कृतज्ञ प्रतिक्रिया इंगळे यांनी व्यक्त केली आहे.नारायण इंगळे हे मुळचे लातूर येथील आहेत. लातुर जिल्ह्यातील मुरूड येथे त्यांनी 1 ली ते 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर परभणी येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण पूर्ण केले व पुढील इंजिनीअरिंगचे शिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले.