<
जळगाव(जिमाका)- जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्याकरीता झालेल्या नुकसानीचे पंचनामे चार दिवसाच्या आत पूर्ण करुन अहवाल शासनास सादर करा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिलेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रुपा गोजरे, लघु पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. भदाणे, कार्यकारी अभियंता श्री. बेहरे, श्रीमती कुलकर्णी, श्रीमती ठाकरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ ए. डी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहू नये याकरीता शेतपिकांचे नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ होणे आवश्यक आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांनी तातडीने नुकसानग्रस्त गावातील पंचनामे पूर्ण करावे पंचनामे करण्यासाठी उशीर होता कामा नये याकरीता वरिष्ठ स्तरावर नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर पुरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन नागरीकांना दळणवळण सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी. ज्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात वीजेचे पोल, तारांचेही नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने नागरीकांना तातडीने वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी युध्दपातळीवर दुरुस्ती मोहीम राबवावी. पाटबंधारे विभागाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन साठवण बंधारे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रत्येक विभागाने तातडीने आढावा घेऊन आपआपल्या विभागाचे नुकसानीचे अहवाल सादर करुन दुरुस्तीचेही प्रस्ताव सादर करावे. जेणेकरुन सदरचे अहवाल शासनास वेळेत सादर करणे शक्य होईल.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात 14 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. 244 मोठी जनावरे, 230 लहान जनावरे मृत्युमुखी पडली आहे. 1600 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुका वगळता इतर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या 119 टक्के पाऊस झाला असून जिल्ह्यातील मोठे प्रकल्प 95 टक्के, मध्यम प्रकल्प 92 टक्के तर लघु प्रकल्प 82 टक्के भरल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली. जिल्ह्यात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील 32 मंडळात 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून पंचनामे सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी दिली.
घोडसगांव येथील साठवण बंधाऱ्याचा सांडवा वाहून गेल्याने प्रक्लपाचे 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. भदाणे यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून गेले आहे तर अनेक ठिकाणी पाईप व मोऱ्या वाहून गेल्याची महिती श्रीमती गोजरे यांनी दिली. तर वीज वितरण कंपनीचे एकट्या चाळीसगाव तालुक्यात 40 लाख तर इतर तालुक्यांमध्ये 30 लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती श्री. चौधरी यांनी बैठकीत दिली.