<
मुंबई(प्रतिनिधी)- मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले.
कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरीक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे द. मा. मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.