<
मुंबई(प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिद्ध कथाकथनकार द. मा. मिरासदार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अस्सल ग्रामीण ढंगाच्या कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद दिला, त्यांच्या निधनाने सिद्धहस्त लेखक, प्रतिभावंत साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात पत्रकारितेच्या माध्यमातून केली. पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समिक्षकांनीसुद्धा त्यांच्या लेखनाला दाद दिली. अस्सल ग्रामीण ढंगाच्या माध्यमातून द. मा. मिरासदार यांनी कथाकथनाची आपली वेगळी शैली विकसित केली. मराठी कथाकथन प्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने प्रतिभावान साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.