<
https://mcap.mcgm.gov.in/talk-to-us/ या संकेतस्थळावर सूचना पाठवाव्यात, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन
मुंबई महानगराला वातावरणीय बदल सक्षम बनविण्यासाठी मुंबई वातावरण कृती आराखडा बनविण्याचे काम प्रगतिपथावर असून यामध्ये नागरिकांना सूचना, शिफारशी नोंदविता याव्यात, यासाठी mcap.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. आजमितीस २०० सूचना / प्रतिसाद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. अधिकाधिक नागरिक व तज्ज्ञांना सूचना पाठविणे शक्य म्हणून नागरिकांच्या विनंतीनुसार या सुविधेस मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई वातावरण कृती आराखडा (Mumbai Climate Action Plan) बनविण्यासह त्यासाठीच्या संकेतस्थळाचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी पार पडला. यानंतर, वातावरण बदल संदर्भातील तज्ज्ञ व भागधारकांशी सल्लामसलत करुन आराखडा बनविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. सध्याची कोविड संसर्गाची स्थिती लक्षात घेता, दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे ऑनलाईन चर्चासत्रे आयोजित करुन तज्ज्ञांसह नागरिकांशी चर्चा करण्यात आली आहे. आराखड्याबाबत तज्ज्ञ व्यक्ती तसेच नागरिक यांना त्यांच्या सूचना, शिफारशी mcap.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून पाठविण्यासाठी दिनांक २० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार २०० प्रतिसाद प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. तथापि, अधिकाधिक नागरिक, तज्ज्ञ, संबंधित क्षेत्रातील संस्था यांना सूचना पाठविता याव्यात म्हणून या सुविधेस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचा सकारात्मक विचार करुन प्रशासनाने https://mcap.mcgm.gov.in/talk-to-us/. या लिंकवर प्रतिसाद नोंदविण्यास मुदतवाढ दिली आहे.
कृपया इच्छुक विषय तज्ज्ञ आणि नागरिकांनी संकेतस्थळावर वातावरण बदलाशी निगडित सूचना, शिफारशी पाठवाव्यात. सर्व संबंधित विषय तज्ज्ञ, नागरिक, भागधारक घटकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबई वातावरण कृती आराखडा अंतर्गत संकल्पना आधारीत उपाय हे नोव्हेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच संयुक्त राष्ट्रे वातावरण बदल परिषद (युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स – COP26) आयोजन कालावधीच्या आसपास तयार होण्याची शक्यता आहे.