<
जळगाव(जिमाका)- लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास अवगत करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.
नागरीकांचे प्रश्न तातडीने सोडविले जावे, त्यांच्या तक्रारींचे निवारण व्हावे, याकरीता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्याचा लोकशाही दिन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते, एकात्मिक आदिवासी विकास प्रकपाच्या प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनात नागरीक त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक व्हावी याकरीता येत असतात. त्यामुळे प्रत्येक विभाग प्रमुखाने त्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी कोणत्याही विभागाकडे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व विभागप्रमुखांना दिल्यात. त्याचबरोबर नागरीकांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे तसेच आस्थापनाविषयक बाबी लोकशाही दिनात दाखल करु नये असे आवाहन केले.
आजच्या लोकशाही दिनी प्राप्त झाले २२ तक्रार अर्ज आज झालेल्या लोकशाही दिनात जळगाव तहसील कार्यालयाकडे आठ अर्ज प्राप्त झाले तर जामनेर तहसील कार्यालयाकडे दहा, यावल, भडगाव तहसील कार्यालयाकडे प्रत्येकी एक अर्ज प्राप्त, चाळीसगाव तहसील कार्यालयाकडे दोन याप्रमाणे एकूण 22 तक्रार अर्ज प्राप्त झाले. बैठकीत या अर्जावर चर्चा करुन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच मागील लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या प्रलंबित अर्जावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.