<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यात शासनस्तरावर सर्वत्र वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ वन्यजीव अपंगालय उभारण्यात येत असून ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. सृष्टी वाचविण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
वन्यजीव सप्ताहांतर्गत आज म्हसरूळ येथील निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ या प्रस्तावित ईमारतीचे भूमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनरक्षक पूर्व तुषार चव्हाण, उपवनरक्षक पश्चिम पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे तसेच वनविभागातील इतर पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा वनविभागांतर्गत नाशिक, त्र्यंबक, ईगतपुरी, सिन्नर, पेठ, बा-हे, हरसुल, ननाशी असे एकूण ८ वनक्षेत्र असून, दिंडोरी, निफाड व सुरगाणा या तालुक्यांचा अंशत: समावेश होतो. जिल्ह्यातील पश्चिम विभाग क्षेत्रात प्रामुख्याने बिबट, तरस, कोल्हा, ससा, मोर, माकड, उद मांजर इत्यादी वन्यप्राणी आढळून येतात. तसेच नाशिक, सिन्नर व इगतपुरी वनक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. या अपंगालयाच्या माध्यमातून जखमी व आजारी वन्यप्राणी व पक्षी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून, वन्यजीवांसाठी उभारण्यात येणारे हे अपंगालय वन्यप्राण्याच्या जीवदानासाठी वरदान ठरेल, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.
वन्यप्राणी बिबटासाठी ८ पिंजरे, वाघासाठी २ पिंजरे, कोल्ह्यासाठी ५ पिंजरे तसेच माकड व हरिण या प्राण्यासाठी दोन पिंजरे असणार असून, या सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळा स्वतंत्र विभागही असणार आहे. त्याबरोबरच उभारण्यात या अपंगालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष अति दक्षता विभाग, अन्न व औषंधांच्या उपलब्धतेसाठी साठवण गृह इत्यादींचीही सोय करण्यात येणार आहे. सदर वन्यजीव अपंगालय ईमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 4 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरुन उपचारा अभावी कोणताही वन्यप्राणी मृत पावणार नाही व वन्यप्राणी संख्या देखील अबाधित ठेवता येईल, अशा सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी योवेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.