<
नागपूर(प्रतिनिधी)- नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण सादरीकरणामध्ये देखील आज त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या.नागपूर सुधार प्रन्यापस कार्यालयामध्ये आज झालेल्या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, महाव्यवस्थापक निशिकांत सुके, विभागीय अभियंत्या लीना उपाध्याय, कार्यकारी अभियंता एस. एम. पोहेकर, विभागीय अधिकारी पंकज आंभोरकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वैशाली नगर नागपूर सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अनेक सूचना करण्यात आल्या. सर्व वयोगटातील नागरिकांचे या ठिकाणी मनोरंजन व्हावे. सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जागतिक स्तराच्या मानकांना वापरून नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
याशिवाय या बैठकीत इंदोरा भागातील पट्टे वाटप, पाहुणे लेआऊट येथील आरक्षण हटविणे, हजरत बाबा ताजुद्दीन परिसरातील सौंदर्यीकरण, वांजरी उत्तर नागपूर या परिसरात वीटभट्टीची जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमणाबाबत कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर बांधकाम पूर्ण करण्याबाबत, कांजी हाऊस चौक ते बारानल चौक अतिक्रमणे हटविण्याबाबत, डब्ल्यूसीएल कार्यालय कबीर नगर चौक ते बाजार चौक सिमेंट काँक्रिटीकरण करण्याबाबत, कळमना पोलीस चौकी ते वांजरा पर्यंत सिमेंट रोड, कोराडी रोड पासून नारा मार्गे कळमना पर्यंत प्रस्तावित कॅनल रोड, संन्याल नगर नारी रोड सन्मान विहाराच्या मागील बाजूला वॉल कंपाउंड तयार करणे, उत्तर नागपूर क्षेत्र अंतर्गत डीपीआर तयार करणे, कोराडी येथे ऊर्जा पार्क विकसित करणे, आदी विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.