<
मुंबई(प्रतिनिधी)– सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.
या कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करण्याचा शासनाचा मानस असून त्या अनुषंगानेच शासकीय पत्रव्यवहार व इतर ठिकाणी या सुनिश्चित चिन्हाचा वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय पत्रव्यवहाराप्रमाणे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात यासंबधीचे बॅनर लावण्याचे निर्देशही सर्व मंत्रालयीन तसेच प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आले आहेत.