<
बुलडाणा(जिमाका)- महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज 5 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला.
यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते. सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व विभागप्रमुख उपस्थित होते.
समितीने सर्वप्रथम महावितरण कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना वीज जोडणी, वस्त्यांमध्ये लाईटची व्यवस्था, मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना, विशेष घटक योजनेच्या निधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावाही घेतला संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या.
त्यानंतर कृषि विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तीक योजना, महाडीबीटीद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना आदींचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर समितीने क्रीडा विभागातील मागासवर्गीय संस्थांना व्यायामशाळा देणे, मागासवर्गीय वस्तीत व्यायामशाळा साहित्य वाटप आदी योजनांचा आढावा घेतला. वन विभागातील अनुसूचित जाती लाभार्थ्यांच्या सोलर कुकर, कुकींग गॅस वाटप योजनेचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत निर्माण करण्यात आलेल्या वसतिगृह बांधकामाचा समितीने आढावा घेत बांधकामे विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.