<
मुंबई(प्रतिनिधी)- जनतेप्रती कृतज्ञता या सभागृहातील कामकाजाच्या माध्यमातून होते. जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामातून जनतेप्रति कृतज्ञता दाखवून द्यावी, त्यासाठी आपल्या आवडत्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्यावर सभागृहात व्यक्त व्हावे, माझ्या मतदारसंघासाठी काय मिळाले, माझ्या खात्यात किती तरतूद झाली. कुणाला काय मिळाले, त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले तर त्याला यशस्वी अर्थसंकल्प म्हणता येईल, असे, विचार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे मांडले.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आजच्या दिवसाच्या प्रथम सत्रात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल करण्यात आला होता.
यावेळी उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, वि. स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे सल्लागार आमदार हेमंत टकले, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या चर्चासत्रात विधान सभा आणि विधान परिषदेतील सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थितीत होते.