<
मुंबई(प्रतिनिधी)- आजपासून आपण राज्यातली मंदिरे उघडली आहेत. टाटा मेमोरियल सेंटरच्या परिसरात उद्घाटन होत असलेल्या ‘आशा’ धर्मशाळेमुळे आरोग्य मंदिराचे दारदेखील सर्वसामान्य गरीब रुग्ण आणि नातेवाईकांसाठी खुले झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आज नवी मुंबईच्या खारघर येथे इन्फोसिस फाऊंडेशनने बांधलेल्या ‘आशा’ निवास धर्मशाळेच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.
यावेळी रुग्णांची जगण्याची उमेद जिवंत ठेवणारी सुधा मूर्ती यांच्यासारखी देवमाणसे आपल्यासोबत असणे हे निश्चित आपले भाग्य आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती यांच्यासह नंदन निलकेणी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, परमाणू ऊर्जा विभागाचे सचिव के एन व्यास, सहसचिव संजय कुमार, टाटा मेमोरियल सेंटर संचालक डॉ. आर.ए. बडवे, यांच्यासह इन्फोसिस व टाटा मेमोरियल सेंटरचे इतर मान्यवर उपस्थित होते.
खारघर येथे बांधण्यात आलेली ही १३ मजली अूसन इमारतीत २६० खोल्या आहेत.नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, श्रीमती सुधा मूर्ती या महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील ‘आई’ आज आपल्याला पाहायला मिळाली, सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही, प्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं या स्थितीत श्रीमती मूर्ती यांची दातृत्वाची वृत्ती विरळी आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. जेव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेव्हा नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावनादेखील त्यांनी जपली.