<
जामनेर(प्रतिनिधी)- छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था सारथी पुणे अंतर्गत मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी तारादूत प्रकल्पाची निर्मिती झाली. राष्ट्रपती राजवट मध्ये प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली.
त्यानंतर तारादूतांनी वेळोवेळी आंदोलनं केली छत्रपती संभाजी राजे यांनी सुद्धा सारथी संस्थेच्या प्रमुख मागण्यांमध्ये तारादूत प्रकल्पाची मागणी केली. १९जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छत्रपती संभाजी राजे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, तारादूत प्रतिनिधी व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेच्या १३ मागण्यांपैकी सारथी तारादूत प्रकल्प चालू करण्याच्या सूचना संचालक मंडळाला दिल्या.
परंतू सूचना देऊन ४ महिने उलटूनही अद्यापर्यंत प्रकल्पाबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे तारादूतांवर दोन वर्षापासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता तारादूतांना नियुक्त्या न मिळाल्यास २०ऑक्टोबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन विविध मराठा संघटना यांच्यासोबत करणार असल्याचे निवेदन मेल द्वारे दिले आहे.