<
आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते वारसांना धनादेश वितरीत
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या महिनाभरापासून थैमान घालणाऱ्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात गोरखपूर येथील सोमनाथ रामजी राठोड, पोहरे येथील गोरख रमेश माळी व पातोंडा येथील चंदू श्रावण गायकवाड या तिघांना आपला जीव गमवावा लागला होता.
या तीनही मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये प्रमाणे १२ लाखांच्या मदतीचे धनादेश तसेच चाळीसगाव तालुक्यात गेल्या वर्षभरात कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपवणाऱ्या दहीवद येथील ज्ञानेश्वर मधुकर पाटील, वाघळी येथील दिलीप रामदास धनगर, शिरसगाव येथील दादाजी पिरा काकळीज, पातोंडा येथील दिनेश सुरेश पाटील व ब्राम्हणशेवगे येथील दत्तू अरुण शिर्के अश्या ५ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख प्रमाणे ५ लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते चाळीसगाव तहसील कार्यालय येथे वितरीत करण्यात आले.
यावेळी मृतांच्या वारसांसह चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्रभाऊ राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, नगरसेवक रामचंद्र जाधव, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, पोहरे येथील सरपंच काकासाहेब माळी, पंजाबराव अहिरराव आदी उपस्थित होते. सदर कुटुंबाना शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अश्या सूचना आमदार चव्हाण यांनी प्रशासनाला केल्या.