<
जळगांव(चेतन निंबोळकर)- कोरोना संसर्गाच्या काळात सगळ्यात मोठी भूमिका ही वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टरांची होती व ती त्यांच्यासाठी, कुटुंबासाठी व कर्मचारी वर्गासाठी जोखीमेची होती हे निर्विवाद सत्य आहे.
रेडिओलॉजिस्ट चे कोरोना काळात काम करणे हे जोखीमेचे होते. कारण, रुग्णाच्या जवळ जाऊन त्याच्या अंगाला स्पर्श करूनच सोनोग्राफी करावी लागते. ते ही कुठलीही कोरोना तपासणी आगाऊ न करता! कारण रुग्ण हा त्या ठिकाणी तपासणीसाठीच येत असतो. उपचारासाठी नाही! त्यामुळे कोरोनाचा वाहक हा कुठलाही रुग्ण जो सोनोग्राफीसाठी आलेला आहे तो असू शकतो. अश्या स्तिथीत इतर रेडिओलॉजिकल सेंटर बंद असताना, महिला डॉक्टरांनी रुग्णसेवा विखंडित केली असताना डॉ. गीतांजली ठाकूर जळगाव येथे वास्तव्यास असूनही एरंडोल येथील नचिकेत इमेजिंग सेंटर येथे कार्यरत असलेल्या सोनोग्राफी सेंटर मध्ये कोरोनाच्या दोन्ही लाटेत अखंडपणे सेवा देण्याचे धाडस केले.
लॉकडाऊन मुळे ग्रामीण भागातील दुर्बल व उपेक्षित घटकातील गर्भवती महिलांना सोनोग्राफीची अडचण येऊ नये, गर्भातील व्यंग तपासणी व बाळाची स्थिती लक्षात येण्यासाठी सेंटरची सुविधा या कठीण काळात सुरु ठेवणे अत्यावश्यक व मानवतेला पूरक असल्याची जाणीव ठेवून डॉ. गीतांजली ठाकूर यांनी ही सेवा अखंडीत व सुरळीत सुरु ठेवली. कुठल्याही वाढीव मोबदल्याची मागणी न करता व ती ही कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून ज्यावेळी पीपीई किट उपलब्ध होत नव्हते! माफक तपासणी फी घेऊन आधीपासूनच सेवा देत असलेल्या डॉ. गीतांजली ठाकूर यांनी फक्त सोनोग्राफी न करता, गर्भवती महिलांनी कोरोनाला कसे रोखायचे, काळजी कशी घ्यायची व कोरोना झाल्यास मनोबल खंबीर कसे ठेवायचे याबाबतीत त्यांनी स्वतः मार्गदर्शन करण्याची धडपड केली.
ज्या महिला मास्क घेऊन येत नव्हत्या किंवा घालून येत नव्हत्या, त्यांना मास्क वाटप करुन ते का, कुठे व कसे वापरायचे हे त्यांनी ग्रामीण बोलीभाषेत समजावून सांगितले. कोरोना काळात छातीचा X-RAY ची भूमिका कोरोनाच्या निदानासाठी व पॉजिटीव्ह रुग्णाच्या महत्वाची असल्याने त्यातच ती एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याने ही सेवाही त्यांनी अनेक अडचणींना तोंड देत, मनुष्यबळाच्या कमरतेला न जुमानता आहे त्या कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढवून माफक दरात सुरु ठेवली. तसेच आरोग्य शिबिरातील रुग्णांना मोफत सुविधाही दिली. ज्या रुग्णांना कोरोना सदृश्य चिन्हे दिसलीत त्यांना लगेच सावधान करुन त्यांची कोरोना बद्दल असलेली भीती दुर करुन शासकीय रुग्णालयात पाठविण्याचे काम ही सक्रियपणे केले.
ज्या रुग्णांना छातीच्या सीटीस्कॅन ची गरज भासली त्यांना जळगाव येथे न जाता ती सुविधा एरंडोल येथेच उपलब्ध करुन देऊन योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. गीतांजली ठाकूर यांनी केले. डॉ. गीतांजली ठाकूर या सुखकर्ता फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्वीपासूनच सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन एरंडोल नगरपालिकेने त्यांना एका विशेष पत्रकाद्वारे “कोरोना आरोग्य दूत” (कोरोना ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून नियुक्त करुन प्रोत्साहन दिले. अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील एरंडोल ही पहिलीच नगरपालिका आहे, जिने एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या महिलेला हा सन्मान दिला आहे. डॉ. गीतांजली ठाकूर यांनी एरंडोल शहरात सर्वप्रथम सुखकर्ता फाउंडेशन मार्फत कोरोनाच्या सुरवातीच्या काळात स्व खर्चाने व स्व मालकीच्या उपकरणांचा वापर करुन कोरोनाच्या पूर्व लक्षणांचे आरोग्य शिबीर दुर्बल वस्तीत घेतली व प्रतिबंधनात्मक उपायांबाबत जनजागृती घराघरात पोहचवली.
कोरोनाचा संसर्ग हा सर्वप्रथम सफाई कामगार व नपा कर्मचाऱ्यांना होऊ शकतो म्हणून जैववैद्यकीय कचऱ्याचा योग्य विल्हेवाटी बाबत नपा ला सूचित करण्या बरोबरच एन95 मास्क व फेसशिल्ड चे वाटप करुन, पीपीई किट कसे वापरावे याचेही प्रशिक्षण नपाच्या कर्मचाऱ्यांना केला. डॉ. गीतांजली ठाकूर यांचे पती डॉ. नरेंद्र ठाकूर हेही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे खास करुन कोरोना बाबत जाणून असल्यामुळे येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत योग्य त्या सूचना सुखकर्ता फाउंडेशन मार्फत प्रशासनाकडे पोहचवण्याचा प्रयत्न करुन त्यास मूर्त स्वरूप देण्याची धडपड या दोघांनी केली. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात लोक सहभागातून बसविण्यात आलेली कायमस्वरूपी ऑक्सिजन पाईपलाईनची उभारणी व त्यास सुखकर्ता फाउंडेशन कडून केली गेलेली आर्थिक मदत ही त्याचेच प्रतीक आहे.
कोरोनाच्या लढ्यात अनेक बाबींवर प्रशासनाशी सूचक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न या दोघांनी केला व करत आहे. कोरोनाबाबत समाजात बरेच गैरसमज व अफवा आहेत. निदान चाचण्याबाबत अजूनही गैरसमज असल्याने कोरोना आटोक्यात येत नाही आहे.अश्या परिस्थितीत जनजागृतीची गरज असल्यामुळे सोशल मीडिया व विविध वृत्तपत्रांमध्ये आठ ते दहा विषयांवर विस्तृत लेख प्रसिद्ध झाले आहे. साध्या सोप्या भाषेत निदान चाचण्या व मास्कची उपयुक्तता, पल्स ऑक्सिमीटर यंत्रणेबाबत जागरूकता, प्लाझ्मा डोनेशन, सिटीस्कॅनची गरज, विलगीकरणात व अलगीकरणात काय काळजी घ्यावी, विशेष कोरोनातून मुक्त झाल्यानंतर कशी काळजी घ्यावी, यावर विशेष लेख प्रसिद्ध झाले आहेत. लॉकडाऊन काळात गरजू कुटुंबातील १००० महिलांपर्यंत घरपोच धान्य पोहचवताना कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाय योजनांबाबत व कोरोना लसीकारणासाठी जनजागृती केली.
डॉ. गीतांजली ठाकूर या महिलांच्या आरोग्य या विषयांवर जसे की, स्तन कर्क रोग, वैयक्तिक स्वच्छता, चाळीशी नंतरचे आयुष्य याविषयी गेल्या दहा वर्षांपासून जनजागृती जसे की, व्याख्यान, शिबीर, वृतपत्र लेखन व रुग्णांना मदत असे कार्य करत असतात. सुखकर्ता या स्वयंसेवी संस्थेमार्फत अवयवदाना विषयी जनजागृती तसेच अवयव दात्यांचा सत्कार आदी उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छतेचे महत्व पटावे म्हणून नचिकेत इमेजिंग सेंटर येथे सॅनिटरी नॅपकिन व्हेडींग मशीनच्या माध्यमातून अल्प दरात पॅडचे वाटप करण्यात येते. डॉ.गीतांजली ठाकूर यांनी स्वाकर्तृत्वाने लग्नानंतर शिक्षण घेऊन नचिकेत इमेजिंग सेंटरची स्थापना करुन संयुक्त रित्या सिटी स्कॅन सेंटर, डिजिटल म्यॅमोग्राफी सेंटर, ऍडव्हान्स एमआरआय या आरोग्य दालनांची निर्मिती केली आहे.
डॉ. गीतांजली ठाकूर यांना स्त्री शक्तिपीठ पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार, सेवादूत पुरस्कार, रतनलाल बाफना यांचा हार्ट ऑफ गोल्ड aale.पुरस्कार, कर्तव्य बहुउद्देशीय संस्था, आयएमए, जळगाव व तालुका मेडिकल असोसिएशन, खासदार, आमदार यांच्याकडून सन्मान पत्र तसेच विविध संस्थेकडून गौरविण्यात आले. विशेष म्हणजे २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “आरोग्य साधना” पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.