<
सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.)- आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली, सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार अरविंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळावर आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर कोनशिला अनावरण करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद झाला आहे. या विमानतळामुळे जगभरच्या पर्यटकांबरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांना, आंबा, काजू, फणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल. या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल.