<
जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील वावडदा येथील राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीत समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पत्रकार चेतन निंबोळकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचे स्वागत करुन कार्यशाळेस सुरवात करण्यात आली. भारतामध्ये एक फार मोठी तफावत म्हणजे श्रीमंती आणि गरिबी! याचाच परिणाम म्हणजे पैसे अभावी शिक्षण न घेणे. परंतु, श्रीमंत मुलं उच्च शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी मोठ्या मोठ्या शहरात जातात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एक मोठा गट या महागड्या शिक्षणापासून वंचित राहतो. याच गोष्टीचा विचार करुन गांधीजींनी सांगितल्या प्रमाणे खेड्याकडे चला या वाक्याला हृदयात ठेऊन मोठ मोठ्या संधी सोडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पुणेरी शिक्षण कसे देता येईल या संकल्पनेतून राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमीचा जन्म झाला. ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नातीत वाढलो ती नाती कधीही विसरायची नसते याप्रमाणे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी राजेश जाधव गणित आणि बुद्धिमत्ता अकॅडमी पुणेरी पॅटर्न उपलब्ध देत आहे. असे अकॅडमीचे संचालक राजेश जाधव हे समुपदेशन कार्यशाळेची प्रस्तावना मांडताना म्हणाले.
स्पर्धेच्या युगात पाय रोवून टिकायचं असेल व एवढ्या स्पर्धेच्या गर्दीत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर आत्मविश्वास व स्मार्टपणा असणं गरजेचं असतं. गुणपत्रिकेत ‘अ’ श्रेणी मिळालेले विद्यार्थीही आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे मागे पडलेले दिसतात. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे. त्याशिवाय तुमचे कष्ट, बुद्धिमत्ता काही उपयोगाची नाही. कामाच्या ठिकाणी तर हा आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये आपली ड्रेसिंग, स्वतः ची उपेक्षा नं करणं, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणं, नजरेला नजर देऊन बोलणं, चुका करण्यास घाबरू नका, मनातील भीती दुर करणं तसेच आपल्या प्रशासकीय व सामाजिक जीवनातील देखील यश अपयशाच्या बाजू अमित माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलून दाखविल्या.
तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. याही परिस्थितीला तोंड देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडील कल हा वाढलेला दिसून येत आहे. बिकट परिस्थितीला तोंड देत मुले ‘अधिकारी व्हायचं’ हे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करताना दिसतात.
परंतु स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पेलवत नाही. ही बाब लक्षात येताच अमित माळी यांनी कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके, पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी लागणारे सर्व साहित्य देण्याचे आवाहन केले.स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला घडवायचं असेल आणि समाजासाठी काही तरी योगदान द्यायचं असेल, तर प्रशासकीय सेवेशिवाय दुसरा कोणाताही पर्याय नाही. नियोजनबद्ध प्रयत्न करून आणि त्याला मेहनतीची जोड देऊन या क्षेत्रात यश मिळवता येतंच. असे यावेळी चेतन निंबोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.