<
जळगांव(चेतन निंबोळकर)- येथील शीतल जडे या खेडगाव नंदीचे येथील एच.बी.संघवी हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांनी आपल्या नोकरीचा व्याप सांभाळून कलेक्शन गोल्डन बीड्स ऑफ इंग्लिश पोएम्स व फन विथ इंग्लिश ग्रामर या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले.
तसेच अनेक सामाजिक कविता देखील त्यांनी लिहिल्या आहेत. चूल आणि मूल या परंपरागत चौकटीच्या बाहेर येऊन आता बऱ्याच स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत स्त्रिया आज आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत. प्रवाहात सर्वच पोहत असतात, मात्र खरा आनंद तर प्रवाहाच्या विरोधात पोहण्यात आहे. असे शीतल जडे यांनी यावेळी सांगितले.
त्यांचे स्वतःचे एक साई समीक्षा प्रतिष्ठान असून त्या अध्यक्षा आहेत. त्यांनी आपल्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कोरोना काळात निराधार गरजू लोकांना अन्नदान आणि किराणा देऊन सर्वोतपरी मदत केली. तसेच शहरातील शासकीय कार्यालय मोफत सॅनिटाईज करुन प्रशासनाला हातभार लावला. त्यांनी शिक्षक भारती या संघटनेच्या महिला अध्यक्षा म्हणून देखील काम सांभाळले आहे. तसेच त्यांनी शेतकरी संघटना व पोलिस सेवा संघटनेचे महिला जिल्हाध्यक्षा पद जबाबदारीने सांभाळून त्याअंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत विविध ९ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.