<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- सिन्नर, येवला व निफाड या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. सध्याचा काळ हा सण, उत्सवांचा आहे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटाझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन कटाक्षाने करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयाच्या ऑक्सीजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी लालसगावचे सरपंच तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतिष सुर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे, आदिंसह रूग्णालयातील आरोग्यकर्मी उपस्थित होते.यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. आगामी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत सक्षम झाला आहे.
आज येथील ऑक्सिजन प्लांटच्या व्यवस्थेमुळे कोरोना शिवाय इतर आजाराच्या रूग्णांनाही ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या प्लांटची क्षमता 20 एन.एम. क्युब इतकी असून 340 लिटर प्रती मिनिट ऑक्सिजन या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. याशिवाय लिक्विड ऑक्सिजनचे जंबो सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व ड्युरा सिंलेंडर्सचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे, असेही यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.