<
जळगाव(प्रतिनिधी)- लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते, त्यामुळे लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी बेकरी प्रोडक्ट्स, तळलेले पदार्थ खाणे टाळा, असा सल्ला जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त फिजीओथेरपी तज्ञांनी दिला. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त फिजीओथेरपी ओपीडीमध्ये रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संपूर्ण शरिराचे वजन, त्यातील फॅट्स आणि चरबीचे प्रमाण किती आहे हे तपासून त्यातील स्नायूंची ताकत आणि त्याच्या क्षमतेची देखील पाहणी करण्यात आली. सदर व्यक्तीच्या शरिरात जर जास्त फॅट्स आणि चरबी असेल तर ती कशी घटवावी आणि शारिरीक ताकद आणि क्षमता कशी वाढवावी याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी डॉ.निखील पाटील, डॉ.अमित जैस्वाल, डॉ.सुवर्णा सपकाळे यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली तसेच लठ्ठपणामुळे होणारे आजार व दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी १४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.प्रज्ञा महाजन यांच्यासह इंटर्न डॉ.जागृती चौधरी, डॉ.श्रृती मुकूंद, अंतिम वर्षातील विद्यार्थी कुणाल सावंत, चिन्मय वाणी, वैशाली गायतोडे यांनी सहकार्य केले.