<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महिला बचत गट व मायक्रोफायनान्स चे कर्ज केंद्र सरकाने माफ करावे अश्या आशयाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व जळगांव जिल्हाधिकारी यांना दिनांक २५/८/२०२१ रोजी देण्यात आले होते. तरी सदर पत्रावर आजपर्यंत कुठलाही निर्णय न झाल्याने दि पीपल्स फाउंडेशनच्या वतीने उद्या दिनांक १२ रोजी बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला अजूनही काम नाही. लॉकडाऊन काळात घरातील जमापुंजीही खर्च झाली. त्यात दोन वेळेच जेवण, आरोग्य आणि ऑनलाईन शिक्षण यातही बराच पैसा खर्च झाला. दोन मुलं असणाऱ्या परिवाराची तर तारेवरची कसरतच झाली. बरीच कुटुंब भाडोत्री घरात राहतात. घरभाड्यासाठी घरमालकांचा तगादा आणि आर्थिक आवक बंद यात घरभाडे भरायचे तरी कसे? लॉकडाऊन काळात बऱ्याच लोकांना आजारपणाला सामोरे जावं लागलं.
आर्थिक आवक कुठूनही नाही. त्यात पैसे देणाऱ्यांनी अरेरावी, शिवीगाळ, धमक्या असे मार्ग अवलंबले. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी कर्ज उपलब्ध केले जातं आहे. ज्यात महिला लघुउद्योग करुन आपल्या परिवाराला हातभार लावत आहे. आजवर घेतलेले कर्ज हे वेळेवर फेडले गेले मात्र लॉकडाऊन मुळे त्यांचे व्यवसाय बंद पडले. आवक नसल्याने हप्ता भरायचा कुठून? बचत गटाचे वसुली अधिकारी कर्जदारांच्या घरी येऊन पैशाचा तगादा लावून अपमानस्पद वागणूक दिली जाते.
हा प्रकार घरातील सदस्यांसमोर होत असल्याने बरेच जन मानसिक ताणात आहे. यातच कुटुंबासह आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले. तरुण पिढी जी देशाचं भविष्य आहे ते या ताणामुळे सहज विशप्राशन किंवा गळफास लावून घेत आहे. यावर विचारमंथन करुन त्यावर उपाययोजनाची गरज आहे. महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे कर्ज केंद्रसरकारने माफ करुन त्यांना या ओझ्यातून मुक्त करावे. जेणेकरून त्यांना नव्याने आयुष्य सुरु करण्याची संधी मिळेल. कारण कर्जदारच्या कुटुंबाला या परिस्थितीला सामोरे जाणे आता शक्य नाही.
अश्या महिलांच्या मागण्यांसाठी दि पीपल्स फाउंडेशनच्या वतीने उद्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. यात समविचारी व्यक्ती, सामाजिक संस्था, प्रतिष्ठान यांचा देखील पाठिंबा असल्याचे दि पीपल्स फाउंडेशनच्या अध्यक्षा गायत्री सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.