<
जळगाव(प्रतिनिधी)- कोविडची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णाला म्युकरमायकोसिसनेही सोडले नाही.. चेहर्यावर सुज… एक सेंकदही ऑक्सीजन मास्क काढणेही अवघड… इतकी विदारक परिस्थीती निर्माण झालेल्या रुग्णावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ञांनी उपचार केले आणि दैव बलवत्तर असल्याची प्रचिती मोरे कुटूंबियांना आली असून आमच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे कायमच खुप उपकार राहतील, अशा शब्दात रुग्णालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
बोदवड तालुक्यातील रहिवासी असलेले रामेश्वर रामकृष्ण मोरे (वय ३८) ह्या रुग्णाला एप्रिल महिन्यात कोविड झाला. रामेश्वरला श्वास घेणेही कठीण झाले होते, अशा अवस्थेत जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. श्वास अधिक लागत असल्याने व्हेंटीलेटर रुग्णाला लावण्यात आले, एक, दोन नव्हे तब्बल २४ दिवस रुग्ण रामेश्वर व्हेंटीलेटरवर होता. त्यानंतर पुन्हा ऑक्सीजन मास्क लावण्यात आला. अगदी जेवण करण्याइतपतही त्याला मास्क काढणे शक्य नव्हते, ही परिस्थीती पाहून पत्नी, मुले, मेहुण्याच्या डोळ्यातून सतत अश्रुंच्या धारा सुरु होत्या. दिवस उगवायचा मात्र रामेश्वरच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, आज नाही उद्या बरे होतील असे करत करत चार महिने उलटले. मात्र आहे ती परिस्थीती कायमच होती, रुग्णासह नातेवाईकही कंटाळले, त्यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाशी संपर्क साधला, रुग्णाची पार्श्वभूमी सांगितली, कोविडमुळे भरती आहे मात्र आता चेहर्यावर डाव्या बाजूला सुज आली असून डोळ्याच्या बाजूचा भाग टम्म फुगला होता. परिणामी रुग्णाला चेहरा आणि सायनसमध्येही प्रचंड वेदना होत होत्या.
येथील कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे यांनी परिस्थीती जाणून घेतली, रुग्ण फार गंभीर आहे मात्र आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करु असे सांगताच, रुग्णाचे मेहुणे विलास बनसोडे हे रुग्णाला घेऊन डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आले.सर्वप्रथम रुग्ण रामेश्वरचा सीटी स्कॅन तसेच आवश्यक चाचण्या करुन घेण्यात आल्यात. त्यात म्युकरमायकोसिसची लक्षणे स्पष्ट दिसून आली. लगेचच म्युकरमायकोसिसच्या वॉर्डात रुग्णाला हलविण्यात आले, तात्पुरते उपचार सुरु केले.
महात्मा फुले योजनेत प्रकरण मंजुर होताच म्युकरची शस्त्रक्रिया कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे, डॉ.अनुश्री अक्ष्रवाल, डॉ. पंकजा बेंडाळे यांनी केली. शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ञ विभागाचे ही मोलाचे शहकार्य लाभले. तसेच रेसिडेंन्ट डॉ. हर्षल, डॉ. श्रृती यांनीही रूग्णाची काळजी घेतली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत गेली. सहा महिन्यापासून पलंगाला खिळलेल्या रुग्णाचा ऑक्सीजन मास्कही आता निघाला, तो चालायला लागला आणि रुग्णाची पत्नी, मेहुणा ह्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तब्बल सात महिने रुग्ण विलास आपल्या घरापासून दूर राहिला होता अखेरीस सोमवार, ११ ऑक्टोंबर रुग्णाला सुट्टी देण्यात आली.
हिंमत अन इच्छाशक्तीच्या जोरावर दाजी बरे झाले -विलास बनसोडे जीवनात पहिल्यांदाच रुग्णालयात येण्याचा प्रसंग आला. माझे दाजी रामेश्वर यांना एप्रिल महिन्यात कोविड झाला. त्यांना ऑक्सीजन लागत होता, मी माझी बहिण आणि मित्र मिळून दाजींना सिव्हीलमध्ये दाखल केले, चार महिने उलटले तरी दाजींची प्रकृती सुधारत नव्हती, व्हेंटीलेटरवर तब्बल २४ दिवस, त्यानंतरही ऑक्सीजन मास्क कायमच होता. सततच्या मास्कमुळे दाजींचा चेहरा दुखत होता, चेहर्यावर सुजही आली, तेथील डॉक्टर म्हणाले यांना म्युकरमायकोसिस झाला आहे, आम्ही दाजींना घेऊन येथे आलो, येथेही डॉक्टरांनी खात्री नसल्याचे सांगितले मात्र आम्ही हिंमत दाखविली, दाजींचे नशिब जोरदार आणि तज्ञ डॉक्टरांचे अथक प्रयत्न यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि दाजी सुखरुप बाहेर आले. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या काळात ऊन, वारा, पाऊसही सोसला, सिव्हीलच्या बाहेर मिळेल त्या जागेत झोपायचो, कधी जेवण मिळायचे तर कधी नाही, रात्री दाजींना पाहायचो मात्र सकाळी खुप हिंमतीने त्यांना पाहायला जायचो, त्यावेळी त्यांच्या बाजूचा रुग्ण गायब असायचा, खुप घाबरायला व्हायचे मात्र दाजींची इच्छाशक्ती आणि आमच्या प्रयत्नांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आल्यावर यश मिळाले. येथील डॉक्टर पण खुप प्रेमळ, त्यामुळे आम्हाला खुप छान वाटले.