<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या (खेळ, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळित, दरोडा, अपघात इतर नैसर्गिक आपत्तीत बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, पाल्य तसेच सामाजिक कार्य आणि पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारे आणि शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षेत ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युतर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी. आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, पाल्यांनी या कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसाठी २० ऑक्टोबर, २०२१ पर्यंत कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधितांनी येताना ओळखपत्राची छायांकित प्रत, दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र आणावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.