<
गडचिरोली(जिमाका)- गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकेल. हे सुत्र लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून भविष्यात प्रयत्न केले तर गडचिरोलीसह परिसराचा निश्चितच विकास होऊ शकेल अशी आशा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केली.
या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे आणि मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली.गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचीही उपस्थिती होती.
या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली. स्व.सुनिल देशपांडे यांच्या वतीने श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी ही पदवी स्वीकारली.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मूलतः मोठी उद्यमशीलता असून तिला अनुरुप वाव देण्यासाठी प्रयत्नांची गरज अधोरेखित करतांना राज्यपाल म्हणाले, निर्सगाच्या कुशीतील या विद्यापीठावरील जबाबदारी मोठी आहे. लोकल ते ग्लोबल या सुत्रानुसार येथील विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासासोबतच देश आणि जगाच्याही कल्याणाचा विचार करावा. समर्पित भावनेने अविरत प्रयत्न केल्यास आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन येथील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावे.
स्टार्टअपसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून उद्यमशीलता जोपासून आपल्या परिसराच्या सर्वंकष परिवर्तनासाठी निष्ठेने प्रयत्न करावेत. राज्यातील प्रगत शहरी भाग आणि आदिवासी दुर्गम भाग यात मोठे अंतर आहे. ते भरुन काढण्यासाठी येथील विकासासाठी नव्या शिक्षित पिढीने स्वावलंबनावर भर देण्याची गरजही त्यांनी प्रतिपादीत केली.