<
गडचिरोली(जिमाका)- देशाबाहेरील तसेच देशातील विविध समाजविघातक प्रवृत्तींचा बिमोड करण्यात आपल्या सुरक्षा दलांनी मोठे योगदान दिले असले तरी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. यामुळे सर्वसामान्यांनी त्यासाठी निर्धाराने कटीबद्ध राहण्याची गरज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.
त्यांच्या हस्ते आज येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गडचिरोली-केवडीया सायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गडचिरोली बटालियनकडून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, सीआरपीएफच्या अतिरिक्त महानिर्देशक (दक्षिण विभाग) रश्मी शुक्ला, पश्चिम विभागाचे महानिर्देशक रणदीप दत्ता आदी उपस्थित होते.
देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान प्रयत्नांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले, वल्लभभाई हे अत्यंत दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या नियोजनामुळे आज देशाला मोठा लाभ झाला आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सीआरपीएफने आयोजित केलेली ही रॅली देशातील विविध भागातील नागरिकांना एकतेचा संदेश देणारी ठरेल.
समाजविघातक प्रवृत्तींमुळे आज समाजाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. आपली सुरक्षा दल त्यांचा मुकाबला करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी त्यांना यथाशक्ती पाठबळ द्यावे, असे आवाहन करुन राज्यपालांनी आपल्या भाषणात सीआरपीएफच्या योगदानाचा विशेष गौरव केला.