<
जळगांव(चेतन निंबोळकर)- शहरातील शिव कॉलनी येथील रहिवाशी निवेदिता ताठे या निराधार महिलांच्या सोबत एक ढाल बनून राहत असून त्यांचे कार्य देखील ढाली सारखे टणकच आहे. जागर स्त्री शक्तीचा! या उपक्रमाखाली थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्या कार्याविषयी…
क्रांतिज्योती सावित्री बाई फुले बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असून सन २००१ मध्ये त्यांनी स्थापना केली आहे. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक काम केली आहेत. यात मुलींच्या विकासाला वाव देणे त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देणे. त्यांनी १० निराधार गरजू मुलींना दत्तक घेऊन त्यांचे संपूर्ण शैक्षणिक खर्च करीत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून त्यांनी झाडे लावून त्यांचे दत्तक योजनेत संगोपन केले. आरोग्यात कॅन्सर, रक्तदान शिबीरे, नेत्रदान यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी महात्मा फुले शिक्षण हमी योजने अंतर्गत १० वर्ष मोफत शैक्षणिक वर्ग चालवला आहे. तसेच त्यांनी ५ विवाह स्वतः लावून देत सामूहिक विवाह सोहळ्याचे देखील आयोजन केले आहे.
त्या जिल्हा महिला दक्षता समितीतर्फे अनेक विवादित जोडप्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या संसारात मनोमिलन करुन त्यांचे वैवाहिक जीवन सुखी करुन दिले आहे. तसेच त्यांनी अनेक महिलांना वाम मार्गाला जाण्यापासून प्रवृत्त केले आहे. अनेक अशिक्षित महिलांना संजय गांधी, श्रावण बाळ या शासकीय योजना समजावून सांगत त्यांना लाभ मिळवून दिला आहे. तसेच विविध सामाजिक मेळावे, मोर्चे व आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
आदमपूर पंजाब येथे IFWA सेक्रेटरी म्हणून निवड झाल्यावर त्यांनी महिलांना लेडीज शॉप उघडून देत, वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून महिलांचा विकास केला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच असल्याने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होताना दिसतो. आधुनिक काळात त्यांना राजकीय, प्रशासकीय व व्यवस्थापन क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे, तरच त्यांचा आर्थिक दर्जा सुधारेल व राष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान वाढेल. असे त्यांनी या माध्यमातून सांगितले.
त्यांच्या या महिला विशेष कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, केंद्र शासनाच्या माजी सैनिक कल्याण बोर्डाच्या वतीने विशेष गौरव, दिल्ली येथील अखिल भारतीय दलित साहित्यिक अकॅडमी तर्फे विरांगणा सावित्रीबाई फुले फेलोशिप तसेच महाराष्ट्र दलित साहित्यिक अकॅडमी तर्फे सावित्रीबाई फुले समाजसेविका आदी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.