<
मुंबई(प्रतिनिधी)- माजी राष्ट्रपती दिवंगत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिवसाचं औचित्य साधून, वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळावे, वाचनाचा प्रचार, प्रसार व्हावा आणि अधिकाधिक लोकांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स तसेच व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट या संस्थांनी मिळून एका डिजिटल अभिवाचन सोहळ्याचे आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे.
राज्य मराठी विकास संस्थेद्वारे व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट यांच्या सहकार्याने महाजालीय अभिवाचनाचा एक आगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. १५ आणि दि. १६ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी सायंकाळी ६:०० वा. ते ७:१५ वा. प्रत्येकी ७५ मिनिटे असा एकूण अडीच तासांचा हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे ठरलेल्या वेळेपासून थेट प्रक्षेपण राज्य मराठी विकास संस्था, व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
या अभिवाचन सोहळ्यात मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मराठी भाषाराज्यमंत्री विश्वजीत कदम, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार हेमंत टकले, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, दिनेश अडावदकर, डॉ. महेश केळुसकर, श्रीमती सीमा देशमुख, समीर दळवी, डॉ. प्रिया जामकर, डॉ. रेखा दिवेकर, श्रीमती मीनाक्षी पाटील, अक्षय शिंपी, श्रीमती सुलभा सौमित्र, श्रीमती मधुरा वेलणकर, राजन ताम्हाणे, श्रीनिवास नार्वेकर, श्रीमती अस्मिता पांडे, श्रीमती अमृता मोडक, डॉ. गिरीश पिंपळे, श्रीमती अदिती सारंगधर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण राज्य मराठी विकास संस्था, व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट, मिती क्रिएशन्स आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून करण्यात येणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून समाजात वाचनाविषयी प्रेम वाढेल, तरुणांमध्ये चांगले वाचायची गोडी निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने वाचनाची प्रेरणा लोकांमध्ये जागवली जाईल असा विश्वास राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.तसेच महाजालीय अभिवाचन स्पर्धेचा कार्यक्रम दि. १८.१०.२०२१ रोजी सायंकाळी ६:०० वा. ते ८:०० वा. प्रिमिअर स्वरूपात प्रसारीत करण्यात येईल. हे दोन्ही कार्यक्रम निर्धारीत वेळेत पूर्ण झाल्यानंतर मात्र संपूर्ण कार्यक्रम केव्हाही पाहण्यासाठी उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी संपर्क ९९३०११५७५९.