<
मुंबई(प्रतिनिधी)- लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी तृतीयपंथी देह व्यवसाय करण्याऱ्या स्त्रीया आणि दिव्यांगांचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. याकरिता विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या कालावधीत दि. 13 व 14 नोव्हेबर आणि 27 व 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करून या वंचित घटकांची मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वीपअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये राज्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी, राज्यातील विविध सामाजिक संस्था, धर्मदाय संस्था, तृतीयपंथीसाठी कार्य करणाऱ्या संस्था अशा विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.देशपांडे यांनी या सूचना केल्या.
बैठकीस मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे उपस्थित होते.तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रीया, दिव्यांग यांच्यासमवेत सर्वसाधारण नागरिकांसाठीही दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी दि. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या व्यक्तिंचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येईल. नोंदणी करताना कोणत्याही घटकांना कागदपत्रांच्या अडचणी येणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात यावी.
जिल्हास्तरावर उपजिल्हा निवडणूक अधिकारी तर तालुकास्तरावर प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी योग्य समन्वय साधून 18 वर्षे पूर्ण झालेल्या व होणाऱ्या नागरिकांची मतदार नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना श्री.देशपांडे यांनी केल्या.कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जास्तीत जास्त नोंदणी करण्याबाबत पुढाकार घ्यावा. मतदारयादीत दिव्यांगांची चिन्हांकित नोंद करून घ्यावी जेणेकरून दिव्यांगांना मतदान केंद्रावर येण्यास मदत करता येईल. जे नागरिक भारताबाहेरील आहे अशा नागरिकांचा यादीत समावेश करता येणार नाही. पण त्यांच्या मुलांचा जन्म भारतात झाला असेल, तर त्यांचेही नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना श्री.देशपांडे यांनी केल्या.