<
मुंबई(प्रतिनिधी)- माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आज वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन केले. पुढच्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन सशक्त समाज उदयास यावा, अशी अपेक्षा श्री. गवादे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्यासाठी नव्या पिढीने वाचनाची आवड आवर्जून जोपासणे गरजेचे आहे. वाचन प्रेरणा दिनातून आणि डॉ. कलाम यांच्या व्यक्तीमत्त्वातून सर्वांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही श्री. गवादे म्हणाले. श्री. गवादे यांनी समर्थ रामदास स्वामी रचित करुणाष्टकांचे अभिवाचन केले.मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन केले. सर्वांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.