<
मालेगाव(उमाका वृत्त सेवा)- असंख्य चिमुकल्यांच्या डोळ्यात असलेल्या भविष्याचा दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सामाजिक दायित्व निधीतून विकास साधतांना विलक्षण आनंद होत असून तालुक्यातील सर्व शाळांचा या माध्यमातून विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले.
सिंजेंटा इंडीया लि. या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेल्या तीन जिल्हा परिषद शाळांचे लोकार्पण कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी सिजेंटा कंपनीचे पी.एस.जगदिशा, संजय पवार, भगवानराव कापसे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नायब तहसिलदार विकास पवार यांच्यासह निळगव्हाण, हाताणे व जळकू या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्यांबरोबर सर्व शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, गोरगरिबांची मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या खोल्यांची दयनिय अवस्था पाहून त्यांना उभारी देण्याच्या उद्देशाने, सामाजिक दायित्व निधीतून त्यांचा विकास साधण्याचे ध्येय ठरविले होते. गतवर्षी निळगव्हाण, हाताणे व जळकू येथील नुतन इमारतींचे भुमीपूजन करण्यात आले होते, आणि आज त्याच शाळांच्या भव्य इमारतींचे लोकार्पण करतांना आनंद होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या शाळांच्या नवीन इमारतींची देखभाल राखण्याची जबाबदारी शिक्षकांसोबतच सर्व ग्रामस्थांनी पार पाडावी असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.