<
गडचिरोली(जिमाका)- महाराष्ट्रातील धानाची खरेदी किंमत पाहून चुकीच्या पध्दतीने शेजारील राज्यातून कमी प्रतीचे धान आणले जाते. यातून राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासनाने योग्य तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गडचिरोली येथे दिले. ते गडचिरोली येथे दौऱ्यावर असताना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते.
जिल्ह्यात धान उत्पादन जास्त असून बाहेरील धान जिल्हयात चोरून आल्यास, येथील धान खरेदी आणि साठवणूकीवर ताण येतो, राज्य शासनाचा पैसा वाया जातो. त्यामूळे परराज्यातील धानावर कारवाई करून आपल्या शेतकऱ्यांचे धान शंभर टक्के खरेदी केंद्रांवर पोहचेल यासाठी नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल,नागपूर विभागाचे पुरवठा उपायुक्त रमेश आडे,जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे, टीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार, वैधमापन विभागाचे सहनियंत्रक बिरादार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते.