<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- राज्यात आजपासून 24 ऑक्टोबर पर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दर्जेदार अनुदानित बियाण्यांचा उपयोग करावा असे आवाहन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
आज आंतरवेली फाटा, पिंपळगाव येथे आयोजित हरबरा प्रमाणित बियाण्यांच्या राज्यस्तरीय वितरण शुभारंभ् प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आमदार दिलीप बनकर, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे,कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ , उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, निफाड तालुका कृषी अधिकारी भटू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आज शुभारंभ झालेल्या प्रमाणित हरभरा वितरण सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पीक उत्पादन क्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रयोगातून वितरण केल्या जाणाऱ्या 20 किलोच्या बियाण्यांच्या बॅगची किंमत रूपये 1 हजार 720 इतकी आहे. परंतु एका बॅग मागे रूपये 500 सूट मिळणार असून शेतकरऱ्यास ती बियाण्याची बॅग 1 हतार 220 या किंमतीत उपलब्ध होणार आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी 8 हजार क्विंटल प्रमाणित हरबरा बियाण्यांच्या साठ्याची तरतुद करण्यात आली आहे. यात पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत व फुले विक्रम या वाणाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचप्रमाणे रबी हंगामासाठी गव्हाचे बियाणे सुध्दा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली आहे.यावेळी प्रातिनिधी स्वरूपात स्थानिक महिला शेतकरी विभावरी गांगुर्डे, मिनाक्षी जाधव व उत्तेशा विधाते यांना 20 किलो प्रमाणित हरबरा बियांण्याच्या बॅगचे वितरण कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.