<
नालासोपारा(प्रतिनिधी)- घरातील कर्ता पुरुष नसेल तर काय होते हे ज्यांचे वडील नसतील त्यांनाचं कल्पना असेलच. असेच एक नालासोपारा मधील फणसे कुटुंब. नवरा देवाघरी गेल्यावर आपल्या मुलांना सांभाळायची जबाबदारी आईने घेतली. मग ती स्वतः उपाशी राहून लोकांची धुणीभांडी करून आपल्या मुलांचं पोट भरायची हिंमत ठेवते.
अशीच एक आई आपल्या एकुलत्या शुभम बाळाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शिक्षण देत आहे. शुभमची आई शोभा रमेश फणसे या नालासोपारा मध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात त्यांना दरमहा ३५०० रु. पगार आहे. उरलेल्या वेळेत त्या खाकरा व पापड बनविण्याची कामे करून घर सांभाळतात. शुभम दहावीत असताना क्लासाची फि भरली नाही म्हणून त्याला क्लास बाहेर काढले. त्यावेळी सामाजिक बांधिलकी संस्थेने आधार देऊन त्याचं दहावीचे शिक्षण पूर्ण केलं. कोरोनाच्या काळात त्याच्या आईला बाहेरची कामे कमी मिळू लागली आणि बारावीच्या शिक्षणाचा भार आर्थिक परिस्थितीमुळे जास्त पडू लागला. यावेळी सामाजिक बांधिलकी संस्थेला एक आवाज देताच त्याच्या बारावीच्या शिक्षणासाठी क्लासेसची फि १२ हजार रुपये व वह्या, पुस्तके, दप्तर पूर्ण वर्षाचे देण्यात आले. यावेळी संस्थेच्या सदस्य स्मिता जठार, अस्मिता पावसकर व त्यांच्या चाळीतले शेजारी उपस्थित होते. शुभमने मोठं होऊन खुप शिक्षण घेऊन आईची स्वप्न आहेत ती पूर्ण करावीत तसेच जशी सामाजिक बांधिलकी संस्था तुझ्या सोबत आहे. तसेच तू मोठं होऊन इतर गरजू मुलांना शिक्षणासाठी व इतर गरजा साठी मदत करावी अशी अपेक्षा यावेळी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.