<
कोल्हापूर(जिमाका)- ‘मोबाईल व इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींचे ज्ञान मिळविण्यासाठी करा. सोशल मीडियाचा वापर योग्य माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी करा. आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम करिअर करा आणि आपल्या आई-वडिलांचं, गावाचं व देशाचं नाव उंचवा,’ असा मोलाचा मंत्र आज क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी दिला.
निमित्त होतं.. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याहस्ते झालेल्या कार्यक्रमाचे!शासकीय अनुदानातून विद्यार्थिनींसाठी मिळालेल्या कबड्डी मॅट व व्यायामशाळेचे उद्घाटन आज क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा क्षेत्रात जिल्हा व राज्य पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार तसेच संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन राज्यमंत्री कुमारी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी शालेय ढोलताशांच्या गजरात व विद्यार्थिनींच्या अभूतपूर्व उत्साहात व टाळ्यांच्या कडकडाटात राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींची भेट घेवून त्यांना प्रतिसाद दिला. तसेच शाळेच्या ग्रंथालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, येथील संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन हरीश बोहरा, उपाध्यक्ष उदय लोखंडे, सचिव बाबासाहेब वडींगे, मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.