<
जळगाव(प्रतिनिधी)- वाढत्या वयोमानानुसार शरिरातील हाडांची झीज होत असते. परिणामी हाडांमध्ये वेदना होणे, हि समस्या निर्माण होते. यासाठी २१ ऑक्टोबर या जागतिक अस्थिसुषिरता अर्थातच ऑस्टिपोरोसिस दिनानिमित्त आज २० ऑक्टोबर रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिराचा २०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
हाडांचा ठिसुळपणा आढळलेल्या रुग्णांना अस्थिरोग तज्ञांसह फिजीओथेरपीस्ट तज्ञांनी देखील मार्गदर्शन केले.गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातर्फे रूग्णालयात हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहूल गिरी, डॉ.निखील पाटील, डॉ.भवानी राणा, डॉ.कल्पना बाचेवार, डॉ.श्रृती चौधरी, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.सुवर्णा सपकाळे, डॉ.साकीब सैय्यद, डॉ. अनुराग मेहता, डॉ.परिक्षीत, डॉ.मुकेश शिंदे आदि उपस्थीत होते.
याप्रसंगी बोन मिनरल डेन्सीटी टेस्ट या मशिनद्वारे टेक्निशियन सुभाष बांद्रे यांनी रुग्णांची तपासणी केली. सर्वप्रथम ऑस्टिपोरोसिस म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा, त्यावरील उपचार पद्धतीची माहिती दिली. यावेळी २०० हून अधिक रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला. अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल, डॉ.परिक्षीत, डॉ.सुनित, डॉ.राहूल यांनी रुग्णांना रिपोर्ट आल्यानंतर ज्यांच्यामध्ये समस्या आढळल्या त्यांना उपचाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच हाडांमधील खनिज वाढविण्यासाठी काही औषधी देखील लिहून देण्यात आल्यात. याशिवाय फिजीओथेरपी ओपीडीतून रुग्णांच्या प्रकृती आणि समस्येनुसार व्यायाम करवून घेण्यात आले आणि ते नियमित करण्याचा सल्लाही देण्यात आला. तसेच अस्थिसुषिरता ही अशी समस्या आहे, जिचे एकदाच निवारण होत नाही. त्यामुळे वयाच्या ३५ नंतर वर्षभरातून एकदा तज्ञांकडून ही तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले.