<
मुंबई(प्रतिनिधी)- मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी उद्या दुपारी ३ वाजता बैठक देखील श्री.सामंत यांनी बोलावली आहे.
आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन साखळी उपोषण सुरू होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यांसंदर्भात माहिती घेवून लगेच आंदोलक विद्यार्थांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि त्यासंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे जाहिर केले.
उच्च व तंत्र शिक्षण संचालकांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चौकशी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले, राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन तत्पर आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असेही श्री.सामंत यांनी सांगितले.