<
मुंबई(प्रतिनिधी)- तेंदूपत्ता ई – लिलाव विकसित करण्याबाबत आलेल्या सूचनांचा योग्य अभ्यास करून वने विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.मंत्रालयातील दालनात तेंदूपत्ता ई लिलाव प्रणाली विकसीत करण्याबाबत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला दूरदृश्यप्रणालीव्दारे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता,उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते.राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे म्हणाले, सध्या तेंदूपत्ता ई -लिलाव प्रणालीमध्ये फक्त स्थानिकच व्यापारी सहभागी होतात मात्र यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी झाले तर तेंदूपत्त्याला चांगला दर मिळून तेंदू पत्तामध्ये काम करणाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल.मात्र यासंदर्भात या क्षेत्रातील उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा निश्चित विचार करू, असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) विकास गुप्ता यांनी सध्याची तेंदूपत्ता ई – लिलाव प्रणालीबाबत बैठकीत माहिती दिली.