<
जळगाव-(जिमाका)-क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव मार्फत क्रीडांगण विकास अनुदान सर्वसाधारण व आदिवासी उपयोजनांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, आदिवासी विभागामार्फत व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविल्या येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा/ आश्रमशाळा, वसतिगृह, क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग, स्पोर्टस क्लब, ऑफीसर्स क्लब तसेच शासकीय महाविद्यालये तसेच खाजगी शैक्षणिक संस्थेव्दारे चालविण्यात येणाऱ्याा अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, शाळा, कनिष्ठ महावद्यालय ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे अशा संस्था तसेच विविध खेळांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये पंजीबध्द असतील अशा संस्था, क्रीडा मंडळेव महिला मंडळे यांना सदर योजने अंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल.
सदर योजने अंतर्गत :- क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मीटर अथवा 400 मीटर धावनमार्ग तयार करण, क्रीडांणास भिंतींचे/तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे, प्रसाधन गृह /चेजींग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहीत्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर/आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे. अशा एकूण १३ बाबींसाठी अनुदान मंजूर करण्यात येते. तथापि या सर्व बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार व दोन हप्त्यानुसार अनुदान मंजूर करण्यात येते.
बिगर आदिवासी व आदिवासी भागातील संस्थाकरिता अंदाजीत खर्चाच्या अनुक्रमे ७५ व ९० टक्के कमाल रु. ७ लाख तसेच जिल्हा परिषद मार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा व आदीवासी आयुक्तालय, नाशिक मार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांसाठी अंदाजीत खर्चाच्या १०० टक्के किंवा कमाल रुपये ७ लाख या पैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. मात्र क्रीडा साहित्यासाठी कमाल रु.३ लाख अनुदान मर्यादा राहील.
क्रीडा साहीत्य मागणी प्रस्तावांसाठी संस्थेकडे सदर मैदाने/ हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.सन २०१९-२०२० व २०२०-२०२१ या वर्षासाठी संस्थांचे अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ/फायदा घेवू इच्छिणाऱ्या बिगर आदीवासी / आदीवासी भागात प्रकल्प राबविणाऱ्या संस्थांनी /शाळांनी अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे दिनांक १सप्टेंबर ते २०सप्टेंबर २०१९ दरम्यान कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव हा ऑन लाईन( On Line ) व्दारे jalgaonsports.in या वेबसाईट वर अपलोड करुन व अपलोड केलेला प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मुळ दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिंद्धी पत्रकान्वये कळविले आहे.