<
पुणे(प्रतिनिधी)- कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना सातत्यपूर्ण दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.लोणावळा येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार दिगंबर भेगडे आदी उपस्थित होते.नागरिकांचे आरोग्य शासनाच्या प्राधान्यक्रमावर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोना संकटाचा अनुभव लक्षात घेता दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत लोणावळा शहरात 100 खाटांचे स्वतंत्र उपजिल्हा रुग्णालय उभे करण्यात येत आहे. लोणावळा व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पुढील काळात उत्तम उपचार सुविधांसाठी हे रुग्णालय उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.