<
अमरावती(प्रतिनिधी)- मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिली.
श्री. देशपांडे यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्याशी निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.
नवतरुणांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक महाविद्यालयामध्ये ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्यात यावा. तसेच विद्यापीठ आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा मतदार यादीतील नोंदणीसाठी सहभाग वाढावा या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यात यावा, असेही श्री. देशपांडे यावेळी म्हणाले.
डॉ. मालखेडे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असून अमरावती विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागासह विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविल्या जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.श्री. देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये बडनेरा येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी पथनाट्य सादर केले.