<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील काव्यरत्नावली चौक येथे “विकेल ते पिकेल” या संकल्पनेवर आधारीत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियाना अंतर्गत फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन जळगांव जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील मान्यवर तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या इ. उपस्थित होते.
यावेळी बांबरुड राणीचे ता. पाचोरा येथील आदर्श युवा शेतकरी मयूर अरुण वाघ यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या रुचकर पपईचा स्वाद मान्यवरांनी चाखून पाहिला. जागतिक किसान महिला दिवसाचे औचित्य साधुन केळी वेफर्स, रेशीम उत्पादन, दशपर्णी व निंबोळी अर्क निर्मीती, मशरुम उत्पादन, भाजीपाला रोपनिर्मीती इ. कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाया १२ महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वाटप सप्ताह साजरा करण्यात येत असुन त्यानिमीत्ताने मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना हरभरा, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी सुत्रसंचालन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन, आभार व समारोप केला.
प्रकल्प उपसंचालक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तालुका/सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.शेतकऱ्यांकडून उत्पादित करण्यात आलेल्या शेतमालास हमखास बाजारपेठ व रास्त दर मिळण्याच्या दृष्टीने जिल्हयामध्ये प्रथमच शेतकऱ्यांच्या मार्फत उत्पादीत केलेल्या केळी, कापुस, हळद, भरताचे वांगे, मका, भाजीपाला, फळपिके इ. शेतमालाचे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि खरेदीदार यांच्या समवेत एकुण २२ करार लेखी करार करण्यात येऊन मान्यवराचे हस्ते हस्तांतरण करण्यात आले.
सदर रोजी सिताफळ-५०० किलो, ड्रॅगन फ्रुट-४५ नग, मोसंबी-३१० किलो, व्हिएनआर पेरु-२६० किलो, आवळा-३० किलो, पपई-१४० किलो, हळद पावडर-९० किलो, भेंडी-४० किलो, विडयाचे पाने- ३०० नग व इतर भाजीपाला इ. ची विक्री होऊन अंदाजे एक लाख सतरा हजार आठशे रुपयांची उलाढाल झाली.