<
पुणे(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आठवडे बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
जिल्ह्याने लसीकरणात चांगली कामगिरी केल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, जिल्हा परिषद तसेच महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सिरम इन्स्टिट्यूट यांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लक्ष लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी.
लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही श्री.पवार म्हणाले.