<
नवी दिल्ली- नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे २२ सायकलवीर देशाच्या राजधानीत दाखल झाले असून ‘नेट झिरो इंडिया’ या उपक्रमांतर्गत दिल्लीकरांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहेत.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली, जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी स्वागत केले.
उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी ‘नेट झिरो इंडिया’ उपक्रमांतर्गंत 20 ऑक्टोबर 2021 पासून दिल्लीत राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण संवर्धन विषयक जागरुकता कार्यक्रमाची माहिती दिली.
एकूण प्रदूषणाच्या टक्केवारीत वाहनांच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाचे 25 टक्के एवढे प्रमाण आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार वातावरणात वाढत असलेल्या हरित वायूचे प्रमाण कमी होण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करावा या उद्देशाने ऐतिहासिक इंडिया गेटहून या उपक्रमाला सुरुवात झाली. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी ‘इंडिया गेट’ आणि महात्मा गांधीजी यांचे समाधी स्थळ ‘राजघाट’ येथे या सायकलस्वारांनी नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले. यासाठी पत्रके वाटली , मौखिक माहितीही दिली. आठवड्यातून एक दिवस “नो वेहिकल डे” पाळावा किंवा महिन्यातून एक दिवस सायकलचा वापर करावा व गाडीचा वापर टाळावा असा महत्वाचा संदेश त्यांनी दिल्लीकरांना पटवून देत आहेत.
यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यात प्रत्येकाचे योगदान लाभेल असे कळकळीचे आवाहन हे सायकलस्वार दिल्लीकरांना करीत आहेत. हे महत्वाचे संदेश त्यांनी सायकलींवरही लावले आहेत.