<
शिर्डी(उमाका वृत्तसेवा)- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. आजही जिल्ह्यात लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक आहेत.
तेव्हा जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी यांनी सातत्यपूर्ण काम करावे, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास,कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केल्या.
अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे, अकोले नगरपंचायत हद्दीतील १२ कोटी १२ लाख रूपयांचे कामांचे व अकोले बाजारतळ सुशोभीकरणाच्या ४ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन श्री. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज झाले. त्यानंतर अकोले येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समिती सभापती ऊर्मिला राऊत, संगमनेर प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार सतीश थिटे, तसेच तालुक्यातील आरोग्य अधिकारी, पंचायती समितीच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.